हास्यकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हास्यकथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २९ जानेवारी, २०२५

सर्दी झालेली बाई (विनोदी कथा)

 “दादेश, तूबी ऑफिददा गेदात तदी चादेद,” सीमा तिच्या गच्च झालेल्या नाकाला झंडू बाम चोळत म्हणाली.

“अजिबात नाही. काल मला सर्दी झाली होती तेव्हा तू माझी सेवा केलीस. आज तुला सर्दी झाली आहे, म्हणून मी घरीच राहून तुझी सेवा करणार.”

डोंबलाची सेवा करणार. माझे काम वाढवून ठेवले नाही म्हणजे नशीब. सीमा मनात म्हणाली.

“तू शांतपणे सोफ्यावर बैस पाहू. मी तुला चहा करून आणतो.” राजेश सीमाला म्हणाला आणि चहा करायला आत निघून गेला.


त्यानंतर काही वेळ स्वयंपाक घरातून भांड्यांच्या धडपडीचे आवाज येत राहिले. एक-दोनदा तर राजेशचा सुद्धा “आई गं” असा आवाज आला. चहा करणे इतके अवघड असेल असे राजेशला वाटले नव्हते. त्याला कोणत्या डब्यात काय आहे हे माहित नव्हते त्यामुळे त्याने स्वयंपाकघरातील जवळपास सगळे डबे उघडून पाहिले. दोन माणसांच्या संसाराला एवढे डबे आणि भांडी कशाला लागतात असा प्रश्न त्याला नेहमीच पडत असे. आज त्याला या प्रश्नाचे उत्तर मिळाले. प्रत्येक डब्यात वेगळे काहीतरी होते. खरंच स्वयंपाकघर चालविणे म्हणजे येरागबाळ्याचे काम नाही. 


सीमा चहाची वाट पाहून कंटाळली होती. तिच्या चहाला नेहमीपेक्षा तासभर उशीर झाला होता. त्यामुळे तिचे डोके दुखायला लागले होते. हा चहा आणायला दार्जिलिंगला गेला कि काय? इतका उशीर?

राजेशचे काय चालू आहे हे पाहायला सीमा आत जाणार इतक्यात राजेश चहा घेऊन बाहेर आला. 

“हा घे गरमागरम चहा.” राजेशच्या चेहऱ्यावर युद्ध जिंकलेल्या सेनापतीचा आनंद होता.

सीमाने सावधपणे चहाचा एक घोट घेतला. 

चहात साखर नव्हती.

“कसा झालाय चहा?” राजेशच्या डोळ्यात बरेच दिवस नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणाची उत्सुकता होती.

“छाद आहे.” कसनुसं हसत सीमा म्हणाली. बिनसाखरेचा तर बिनसाखरेचा, पण हातातोंडाशी आलेला चहा ती जाऊ द्यायला तयार नव्हती. जर चहात साखर नाही असे ती म्हणाली असती, तर राजेश साखर टाकायला तो चहा परत घेऊन गेला असता. आणि मग अजून काही वेळ तिला बिनचहाचे बसावे लागले असते. 

“छान असणारच. आईकडून शिकलोय मी चहा करायला.” राजेश अभिमानाने म्हणाला. “माझी आई काय चहा करते म्हणून सांगू ......” 

सीमाच्या चेहेऱ्यावरचे खुनशी भाव पाहून राजेशने त्याचे वाक्य अर्ध्यावर तोडले.

“थांब. माझा चहाचा कप घेऊन येतो.” राजेश त्याच्या चहाचा काप आणायला स्वयंपाकघरात गेला. 

बाप रे, याने स्वतःला पण चहा तयार केलाय. आता त्याला कळेल चहा कसा झालाय ते.


राजेश त्याचा चहाचा कप घेऊन आला. सीमाच्या समोर खुर्चीत रुबाबात बसला. मग त्याने जगजेत्या सम्राटाच्या आवेशात चहाचा झुरका घेतला. क्षणातच, ट्रकभरून कडुनिंब खाल्याप्रमाणे त्याचा चेहरा झाला.

“साखर थोडी कमी पडलीय वाटतं.” तो म्हणाला. आपली चूक मान्य करेल तो राजेश कसला?

कमी? बेट्या तू साखर घातलीच नाहीस चहात, सीमा मनात म्हणाली. 

“थोदी कबी आहे साखद, पद चहा छाद झादाय.” सीमा म्हणाली. उगीच कशाला राजेशचा इगो दुखवा, असा विचार तिने केला. राजेश चा इगो डोंगराएवढा मोठा आणि पत्त्यांच्या बंगल्याएवढा नाजूक होता. तो कुरवाळला कि सीमाला त्याच्याकडून बरेच काही साध्य करून घेता यायचे.

घोट घोट करीत दोघांनी तो बिनसाखरेचा कडू चहा संपवला. चहा संपेपर्यंत दोघांनीही एकमेकांच्या नजरेला नजर मिळविली नाही.


चहा पिल्यानंतर राजेश अंघोळीला गेला आणि सीमा वेणीफणी करायला आरशासमोर बसली. बिनसाखरेचा का होईना, आयता चहा मिळाल्यामुळे तिची कळी खुलली होती. केस विंचरताना ती गाणे गुणगुणत होती. “बी कशादा आदशात पाहू गं…., बी कशादा बद्धदात दाहू गं…., बीच बाझ्या दूपाची दादी गं…….”


अंघोळ झाल्यावर राजेश सीमाशेजारी येऊन बसला. ती टीव्ही पाहत होती. आज बऱ्याच दिवसांनी दोघे एकत्र टीव्ही पाहत होते. टीव्ही वर सासू-सुनेची मालिका चालू होती.

या सासू-सुनांच्या मालिका राजेशला कायमच गूढ वाटत आल्या होत्या. एका मालिकेतली सून एक वर्षापेक्षा जास्त काळ गरोदर होती. हे कसे शक्य आहे याचे कोडे त्याला अजून सुटले नव्हते. आणि आपले अज्ञान उघड होईल या भीतीने त्याने कधी विचारले नव्हते.

मालिकेतली सून नुकतीच अंघोळ करून आली होती आणि आरशासमोर उभी होती. इतक्यात बाहेर गाडी वाजल्याचा आवाज आला. तिचा नवरा आला होता. नवरा घरात येताना तो पायऱ्यांना अडखळला. त्याचा हातातली गाडीची चावी निसटली. ती जमिनीवर पडून उड्या मारत जाऊन कुंकवाच्या करंड्यात पडली. त्यातले थोडे कुंकू उडाले व त्या सुनेच्या कपाळावर बरोबर दोन भुवयांच्या मध्ये जाऊन बसले. आणि मग त्या कुंकवाचे टिकलीत रूपांतर झाले.

राजेश आ वासून हे सगळे पाहत होता. 

आपण जर शाळेत भौतिकशास्त्राच्या तासाला लक्ष दिले असते, तर आज आपल्यालाही हे कसे होते ते कळले असते, असे वाटून राजेश हळहळला.

थोड्या वेळाने टीव्हीतल्या सासूने सुनेला हाक मारली. सुनेने मागे वळून पहिले. 

तीन वेळा. 

प्रत्येक वेळी वळताना तिचे मोकळे केस गिरकी मारून पुढे यायचे.

राजेश टीव्हीकडे टक लावून पाहत होता. आणि सीमा राजेशकडे टक लावून पाहत होती.

“छान दिसते ना ती,” मनात म्हणायचे वाक्य राजेश मोठ्याने म्हणाला. 

ते हि बायकोसमोर. 

स्वतःच्या. 

सीमाच्या चेहेऱ्याकडे पाहिल्यावर आपली चूक राजेशच्या लक्षात आली. ती खाऊ कि गिळू अशा नजरेने राजेशकडे पाहात होती. तिने रागाने टीव्ही बंद केला. 

“छाद दिसते दा ती, बग कदा तिच्याशीच दग्द. बी जाते बाहेदी दिघूद” ती फणकाऱ्याने म्हणाली.

बायकोसमोर हा माणूस दुसऱ्या बाईच्या सौंदर्याची स्तुती करतो, ती पण टीव्हीतल्या बाईची.

“अगं सीमा माझं ऐकून तर घे. तू तिच्या पेक्षा छान दिसतेस, असे मला म्हणायचं होतं.” राजेश थापा मारण्यात पटाईत होता. 

हे ऐकून सीमा थोडी शांत झाली. 

“खदचं बी तिच्यापेक्या छाद दिसते?” सीमाने विचारले. जगातल्या कोणत्या बाईला स्वतःची स्तुती आवडत नाही. 

“हो खरंच.” धर्मराजाच्या आवेशात राजेश म्हणाला. 

सीमा लाजली.

आणखी किती खोटे बोलावे लागणार या चिंतेत राजेश होता. इतक्यात दरवाजाची घंटी वाजली.


राजेशने दार उघडले. दारात शेजारच्या मोहक मोहिनीला पाहून त्याची कळी खुलली.

“या मोहिनी या,” राजेशने तोंडभरून स्वागत केले.

“मला थोडी चहा पावडर मिळेल का?” तिने पापण्यांची उघडझाप करीत विचारले.

“हो मिळेल ना.” तो म्हणाला आणि चहा पावडर आणायला आत गेला. 

इतक्यात सीमा तेथे आली. उद्या संध्याकाळी काकडे बाईंकडे असलेल्या भिशीची आठवण करून देण्यासाठी ती मोहिनीला म्हणाली, “उद्या सद्याकादी भिती आहे, विसदू दको.”

“कशाची भीती आहे?” मोहिनी घाबरून म्हणाली.

“अगं भीती दाही, भिती” सीमा चोंदलेले नाक हलवत पुन्हा एकदा म्हणाली.

आता मात्र मोहिनी गोंधळून गेली. भीती नसलेली भीती हे प्रकरण काय आहे ते तिला कळेना.

इतक्यात चहा पावडर घेऊन राजेश तिथे आला. “उद्या संध्याकाळी भिशी आहे, ते विसरू नका, असे सीमा म्हणत आहे.” त्याने स्पष्टीकरण दिले. 

ते ऐकून मोहिनीचा चेहरा निवळला. “बरं, बरं” म्हणत चहा पावडर घेऊन ती लगबगीने निघून गेली.

इकडे सीमा मात्र उद्यापर्यंत आपला आवाज ठीक होईल कि नाही या विचाराने काळजीत पडली. भिशीमध्ये सगळ्यांसमोर आपले हसे होईल, हि चिंता तिला लागून राहिली होती.


इतक्यात राजेश चा फोन वाजला. फोन त्याच्या आईचा होता. 

“बोल आई काय म्हणतेस?” लहान मुलाच्या उत्साहात राजेशने विचारले.

“मी ठीक आहे. तू कसा आहेस. तुझा आवाज बारीक येतोय. तुझी बायको तुला जेवण करून घालते की नाही व्यवस्थित…” राजेश च्या आईला ऐकू कमी यायचे, त्यामुळे तिला सगळ्यांचेच आवाज बारीक वाटायचे. फोनवर तिच्याशी मोठ्याने बोलावे लागायचे. 

थोडा वेळ आईशी बोलून राजेशचा घसा दुखायला लागला, पण त्याची आई मात्र फोन ठेवायचे नाव घेत नव्हती. शेवटी कंटाळून त्याने सीमा कडे फोन द्यायचे ठरवले. “सीमा, हे घे फोन, आईशी बोल. तुला बरे वाटेल.”


अंगावर पाल पडल्याप्रमाणे सीमा दूर सरकली. “आदिबात दाही. बी आदादी आहे. बदा बोदता येत दाही.” 

आणि कोणत्या ग्रहावर राहतो हा प्राणी? या जगात कोणत्या सुनेला तिच्या सासूशी बोलून बरे वाटले आहे?


पण राजेश मागे हटायला तयार नव्हता. फोन बंद केला असता तर त्याची आई चिडली असती. चिडलेल्या आई पेक्षा चिडलेली बायको परवडली, असा आत्मघातकी विचार करून त्याने तो फोन गयावया करत सीमाच्या हातात दिला.


नाईलाजाने सीमाने फोन कानाला लावला. तिने तोंडाने एक दीर्घ श्वास घेतला, देवाचे नाव घेतले व म्हणाली, “बोदा सासुबाई”

“गोदा कोण? मी तुझी सासू बोलतेय.” सीमाची सासू ठसक्यात म्हणाली.

पुढे काय वाढून ठेवले आहे याची सीमाला कल्पना आली. पण परतीचे दोर कापले गेले होते. 

“गोदा दाही, बोदा बदादे” सीमाने पुन्हा एकदा प्रयत्न केला.

“सोडा दाढी, खोदा बटाटे? काय बोलतेस तू सुनबाई?”

हि जुगलबंदी संपायचे नाव घेईना. शेवटी सीमाने विषय बदलला.

“तूबची तब्बेत कती आहे सासुबाई?”

“मी ठीक आहे, पण तू का बोबडे बोलत आहेस?” 

“बी बोबदे बोदत दाही. बदा सददी झादी आहे.” 

हे वाक्य सीमाच्या सासूच्या डोक्यावरून गेले. आपल्या सुनेला वेड तर लागले नसेल ना, असे तिला वाटून गेले. आता आपल्या मुलाचे कसे होणार या काळजीने त्या माउलीला काय बोलावे ते सुचेना.

शेवटी तिने “बरं बरं” करत फोन ठेवला.


सीमाच्या अगम्य भाषेमुळे आपल्या आईने लवकर फोन ठेवला याचे राजेशला समाधान वाटले. 

याची बक्षिशी म्हणून तो सीमाला म्हणाला, “चल, आपण आज बाहेर जेवायला जाऊ.”

हे ऐकून सीमा हरकली.

“बी कोददी सादी देसू?”

“कोणतीही साडी नेस राणी. तू कोणत्याही साडीत सुंदर दिसतेस.”

“इश्श,” सीमा लाजली आणि म्हणाली, “बी आदेच पाच बिदितात आवदूद.”

“ठिक आहे, तोपर्यंत मी एक झोप काढतो तासभर” राजेश म्हणाला.

राजेशचा टोमणा सीमाला कळला नाही. गाणे गुणगुणत ती आवरायला आत गेली.

“सददा हे बुझे ......., सददा के दिये ........” 


समाप्त

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

सर्दी झालेला माणूस (विनोदी कथा)

“सीबा, दिबोद दे.” आपले चोंदलेले नाक हलवीत राजेश म्हणाला. 


राजेश सोफ्यावर मांडी घालून बसला होता. त्याने अंगावरून ब्लॅंकेट घट्ट ओढून घेतले होते. त्याच्या आजूबाजूला वापरलेल्या टिशूचा खच पडला होता. सर्दी झाल्यामुळे त्याने ऑफिसला आज दांडी मारली होती. सतत वाहणारे नाक व एकामागोमाग एक येणाऱ्या शिंका यांनी तो बेजार झाला होता. आणि त्याच्या एकामागोमाग एक येणाऱ्या मागण्यांनी त्याची बायको, सीमा बेजार झाली होती. 


सीमाने टीव्हीचा रिमोट त्याच्या हातात दिला. “आता शांतपणे टीव्ही पाहत बसा व मला माझी कामे करू द्या.” ती म्हणाली. राजेशने एक हात ब्लॅंकेटच्या बाहेर काढून तो रिमोट ओढून आत घेतला. बराच वेळ रिमोटशी झटापट केल्यानंतर त्याची चूक त्याच्या लक्षात आली. मग त्याने रिमोट ब्लॅंकेटच्या बाहेर काढला आणि बटन दाबले. टीव्ही चालू झाला. 


“आताची ठळक बातमी - सरकार सर्दीच्या औषधांवरील जीएसटी वाढविणार.” हे ऐकून रागाने त्याने चॅनेल बदलला. दुसऱ्या चॅनेलवर क्रिकेटची मॅच चालू होती. 


“सीबा, उशी आदूद दे” बराच वेळ एकाच जागी बसून राजेश च्या पाठीला रग लागली होती. 

सीमाने त्याला उशी आणून दिली. उशिला टेकून, पाय ताणून तो मॅच बघत बसला. पण टीव्ही पाहण्याचा त्याचा आनंद फार वेळ टिकला नाही.


“अदेदे, विदाद कोदी आऊद झादा.” त्याचा एकमेव आवडता खेळाडू बाद झाल्यामुळे त्याचा मॅच मधला रस संपला. त्याने टीव्ही बंद केला.


तेवढ्यात त्याचा फोन वाजला. ऑफिस मधून बॉस चा फोन होता. “अरे राजेश, ऑफिसला का आला नाहीस आज?”

“सद, बदा सददी झादी आहे.” राजेश म्हणाला.

“काय म्हणालास? बनात गर्दीची झाडी आहे?” राजेशने सकाळीच एखादा पेग घेतला कि काय अशी शंका बॉसला आली.

“सद, बी आदादी आहे.” राजेशने पुन्हा एकदा प्रयत्न केला.

“तू अडाणी आहेस ते मला माहित आहे. तरीही मी तुला कामावर ठेवलेच ना? तू ऑफिसला का आला नाहीस ते सांग.” 

राजेशच्या बॉसला त्याची ह आणि द ची भाषा कळणे शक्य नव्हते. थोडा वेळ बॉस बरोबर शाब्दिक झटापट करून राजेशने नाईलाजाने त्याच्या बायकोकडे फोन दिला.


सीमा ने फोन घेतला, “सर, ते आजारी आहेत. त्यांना सर्दी झाली आहे. म्हणून आज ते ऑफिसला आले नाहीत. पण तुम्ही म्हणत असाल तर मी पाठवून देते.” ही ब्याद ऑफिसला गेली तर बरेच होईल असा विचार करून ती म्हणाली.


“नको नको,” बॉस पटकन म्हणाला. सर्दी झालेला राजेश ऑफिसला आला तर उरलेला स्टाफ पळून जाईल याची त्याला खात्री होती. “त्यांना विश्रांती घेऊ द्या. आणि पूर्ण बरे झाल्यावरच ऑफिसला पाठवा. आणि …” 


सीमाने निराशेने फोन ठेवला.


“बग, बला किदी बहद्व आहे ऑफिद बदे. बॉद दे फोद केदा.” राजेश छाती फुगवून म्हणाला.

“कसलं डोंबलाच आलंय महत्व तुम्हाला.” सीमा फणकाऱ्याने म्हणाली. “गेल्या वेळी तुम्ही आठवडाभर दांडी मारली होती, तेंव्हा ऑफिस मध्ये कोणाच्या लक्षात सुद्धा आले नव्हते. यावेळी तुमच्या कडे ऑफिसच्या वॉशरूम ची चावी आहे म्हणून त्यांनी फोन केला. ते माणूस पाठविणार आहेत, त्याला चावी तेवढी द्या.”

ते ऐकून राजेशचा चेहरा गरीब मालकाच्या गरीब गाईप्रमाणे दिसू लागला. तो सीमाला काही प्रतिउत्तर देणार तेवढ्यात घराची बेल वाजली.


सीमाने दार उघडले. दारात शेजारची मोहिनी उभी होती. “सीमा, अगं थोडी साखर देतेस का?”

सीमा साखर आणायला आत गेली.


“अय्या, राजेश भावोजी तुम्ही आज घरी कसे? ऑफिस ला गेला नाहीत?” मोहिनी ही तिच्या नावाप्रमाणेच मोहक होती. त्यामुळे तिच्याशी बोलण्याची संधी सोसायटीतील पुरुष सोडत नसत. राजेश सुद्धा याला अपवाद नव्हता.


“बी आदादी आहे. बदूद गेदो दाही.” राजेश म्हणाला.


पण त्याचे बोलणे मोहिनीच्या डोक्यावरून गेले. तिने चेहरा कसनुसा केला व स्पष्टीकरणासाठी सीमाकडे बघितले. पण सीमा साखरेची वाटी हातात घेऊन मख्ख चेहेर्याने उभी होती. आपण त्या गावचेच नाही असा अविर्भाव तिने आणला होता, पण मनातून मात्र तिला खूप हसू येत होते. राजेशने अजून काही बोलण्यापूर्वी मोहिनीने वाटी घेतली व लगबगीने निघून गेली. सीमाने हसू दाबत दार बंद केले. राजेशचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता.



थोड्यावेळाने राजेशची पुन्हा चुळबुळ सुरु झाली.

“सीबा, चहा कद एक कप” त्याने फार्मन सोडले, “आदे घादूद”

सीमा नुकतीच धान्य पाखडायला बसली होती. तिने चरफडत हातातले सूप बाजूला ठेवले व चहा करायला आत गेली.


तिने वाफाळत्या चहाचा कप राजेशच्या हातात दिला. 

“अगं, चहा बदोबद बीदकिदे पद दे”

सीमाने दोन बिस्किटे आणून दिली. 

राजेशने बिस्कीट चहात बुडवले. पण ते खाण्यापुर्वीच तुटून चहात पडले. त्याने दुसरे बिस्कीट चहात बुडवले. त्यानेसुद्धा पहिल्या बिस्किटासारखीच हाराकिरी केली. बहुदा त्यांना जिवंतपणे राजेशच्या तोंडात जाणे पसंद नसावे.

“सीबा, अगं चबचा देतेस का? बीदकिदे चहात पददी.” सीमाच्या चेहेर्यावरील भाव पाहून त्याने “पीद” अशी पुस्ती जोडली.

सीमाने त्याला चमचा आणून दिला. राजेशने चमच्याने बिस्किटे खाण्याऐवजी चहा ढवळला. त्यामुळे त्या चहाचे आता बिस्किटांच्या सूप मध्ये रूपांतर झाले.


राजेशने डुगडुगत्या हाताने फुर्रर्र फुर्रर करत चहा संपविला. चहा पिऊन झाल्यावर त्याला थोडी हुशारी वाटली. तरीही बिस्कीट खाण्याच्या नादात चहा गार झाल्याची चुटपुट त्याला लागून राहिली.


थोड्यावेळाने त्याला भूक लागली. 

“सीबा, सूप आद.” तो म्हणाला.

सीमाने तिच्या हातातला सूप राजेशच्या हातात दिला. “बरे झाले, बसल्याबसल्या तेवढे काम तरी करा. तो डबा पाखडून संपवा.”

राजेशला हसावे कि रडावे ते कळेना. आपण धडधाकट असताना घरातले एकही काम करत नाही. तरीही आजारी असल्यावर आपण काम करू; असे आपल्या बायकोला कसे काय वाटले; याचेच त्याला आश्चर्य वाटले. “अगं, तोब्यातोते सूप तयाद कदूद दे, प्यायदा.”

सीमाचा चेहरा पाहण्यासारखा झाला. तिने राजेशच्या हातातून सूप खसकन ओढून घेतला व जमिनीवर आदळला, आणि टोमॅटोचे सूप तयार करायला आत निघून गेली.

काही घडलेच नाही अशा अविर्भावात राजेशने शेजारी पडलेला पेपर उचलला व वाचू लागला. थोडा वेळ त्याने वाचण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या पाणीभरल्या डोळ्यांना अक्षरे दिसेनात. पेपरमधला आलिया भट चा फोटो त्याला रणवीर कपूर सारखा दिसू लागला, तेंव्हा त्याने पेपर बाजूला ठेवून दिला.

मग त्याने कंटाळा घालविण्यासाठी प्राणायाम करायचा प्रयत्न केला. पण गच्च झालेल्या नाकातून टिचभरसुद्धा हवा आत शिरत नव्हती. शेवटी त्याने तो नाद सुध्दा सोडून दिला.


सीमा टोमॅटोचे सूप तयार करून घेऊन आली. गरमागरम सूप च्या वाफेने राजेशचे नाक हुळहुळू लागले. त्याने मोठ्ठा आ वासला आणि सटकून एक शिंक हाणली. त्या शिंकेच्या फटकाऱ्याने शेजारचा वापरून टाकलेला टिशू उडून त्याच्या बायकोच्या तोंडावर जाऊन आदळला. तिने त्याच्याकडे तुडवू कि चेचू अशा नजरेने पहिले. त्याने घाबरून त्याची नजर फिरविली. व आपण त्या गावचेच नाही असे दाखविण्यासाठी गाणे गुणगुणू लागला, “बेदे दोददा … दूद, बेदे प्याद की … दूद”. 


सीमा दात ओठ खात हातांच्या मुठी वळवीत तोंड धुवायला आत निघून गेली. 


सीमाची आई म्हणायची, सर्दी झालेला माणूस आणि वर्दी घातलेला माणूस यांच्यापासून चार हात लांब रहावं. प्रकरण कधी अंगावर शेकेल हे सांगता यायचं नाही.

सीमाला नुकतीच त्याची प्रचिती आली होती.

जर वर्दी घातलेल्या माणसाला सर्दी झाली तर काय होत असेल या विचाराने तिला हसू आले.


“सीबा, पादी आद” सूप पिऊन झाल्यावर राजेश म्हणाला.

सीमाने पाणी आणले. आणि दुरूनच तिचा हात लांब केला. त्यानेही त्याचा हात लांब केला. तरीही त्यांच्या हातांमध्ये फूटभर अंतर होतं. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती आणखी थोडे पुढे आली, पण गरजेपेक्षा एक इंचभर सुद्धा जास्त नाही. शेवटी त्याने कसाबसा पेला हातात घेतला व पाणी पिले.


“सीमा, टीशू दे.” गरमागरम सूप पिल्यामुळे राजेश चे नाक थोडे मोकळे झाले होते. आणि आता ते गळायला लागले होते. त्याचे उच्चारही आता स्पष्ट झाले होते.


“मघाशीच तर दिला होता. आतापर्यंत चार बॉक्स संपविलेत तुम्ही.”

“असू दे. आता पाचवा बॉक्स दे. तुला माझ्या टिशू चा काय इशू आहे कळत नाही.” स्वतःच्याच शाब्दिक कोटीवर खुश होऊन राजेश हसला.


“मी म्हणून तुमचे सगळे नखरे सहन करते. माझ्या जागी दुसरी कोणी असती तर कधीच तुम्हाला सोडून निघून गेली असती,” सीमा टिशूचा बॉक्स त्याच्या समोर आदळत म्हणाली. आजवरच्या संसारात सीमाने कितीतरी वेळा त्याला हे वाक्य ऐकवले होते. पण ते वाक्य तितकेच खरे होते याची जाणीव राजेश ला होती. आपल्याला सहन करणे हे आपल्याला सुद्धा शक्य नाही हे त्यांने आपल्या मनाशी कधीच मान्य केले होते. पण हे काही तो सीमाला बोलून दाखवणार नव्हता. त्याला सीमा सारखी सहनशील बायको दिल्याबद्दल त्याने देवाचे मनोमन आभार मानले.


***

  

दुसऱ्या दिवशी राजेशला जाग आली तेंव्हा सकाळचे सात वाजले होते. रात्रभर त्याला छान झोप लागली होती. त्याला एकदम मोकळे-मोकळे वाटत होते. कालच्या सर्दीचे नामोनिशाणसुद्धा उरले नव्हते. तो अंथरुणात उठून बसला व त्याने छातीभरून एक दीर्घ मोकळा श्वास घेतला. त्याच्या हालचालीने त्याची बायकोसुद्धा जागी झाली. 


“गुड मॉर्निंग, सीमा” तो आनंदाने म्हणाला. 


“गुद बॉदीग” सीमा पुटपुटली. 


समाप्त