Tuesday, 14 January 2025

अंधारी रात्र - भयकथा (संपूर्ण)

 सायंकाळची वेळ होती. बारावीची परीक्षा नुकतीच संपल्याने तो निवांत होता. त्याच्या आवडत्या लेखकाचा भयकथा-संग्रह वाचण्यात तो गुंग झाला होता. इतक्यात दारावरची बेल वाजली. थोड्या नाईजालानेच तो उठला.

त्याने दार उघडले. त्याचे आई-वडील आत आले. वडिलांच्या हातात सामानाने गच्च भरलेली पिशवी होती. ती त्यांनी कोपऱ्यात ठेवली.
“किती उकडतंय!” त्याची आई पुटपुटली व तिने खिडकी उघडली. घाम पुसत ते दोघेही सोफ्यावर बसले.
"अरे, पाणी आण पाहू जरा." त्याचे वडील म्हणाले.
तो पाणी आणायला आत निघून गेला.


***

रात्रीचे जेवण झाल्यावर त्याने पुन्हा भयकथांचे पुस्तक उचलले व पलंगावर आडवा झाला. मघाशी अर्धवट राहिलेली भयकथा त्याला वाचून पूर्ण करायची होती. बराच वेळ तो वाचत होता. कथा पूर्ण झाल्यावर त्याने पुस्तक बंद केले. पलंगाशेजारील विजेचा दिवा बंद करण्यासाठी हात लांब केला. पण तो बटन दाबणार, इतक्यात दिवा आपोआप बंद झाला. तो दचकला. खोली अंधारात बुडून गेली. वीज गेली असेल, त्याने मनाचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. तो डोळे मिटून झोपेची आराधना करू लागला. मध्यरात्र उलटून गेली होती. बाहेर शांतता होती. त्याचे डोळे हळूहळू जड होत होते. इतक्यात त्याला कसलातरी अस्पष्ट आवाज ऐकू आला. कोणीतरी हलक्या आवाजात शीळ घालत असल्यासारखा.

त्याने खाडकन डोळे उघडले. आपल्याला खरंच काही ऐकू आले की झोपेच्या ग्लानीत भास झाला? त्याने पुन्हा डोळे बंद केले. एक मिनिट भराने पुन्हा तोच आवाज आला. यावेळी जास्त स्पष्ट व सलग. आता त्याला दुर्लक्ष करून चालणार नव्हते. तो पलंगावरून उठला व त्याने विजेच्या दिव्याचे बटन दाबले. दिवा लागला नाही. त्याने खिडकीचा पडदा सरकविला व बाहेर डोकावून पाहिले. रस्त्याकडेच्या खांबावर दिवा चालू होता. म्हणजे फक्त त्याच्याच घरातील वीज गायब होती. त्याचा घसा कोरडा पडला. भीतीची एक लहर त्याच्या सर्वांगातून वाहत गेली.

पुन्हा एकदा त्याला ती हलक्या आवाजातील शीळ ऐकू आली. जणू कोणीतरी त्याला बोलावीत होते. काही महिन्यांपूर्वी त्याच्या शेजारील एका तरुणीने प्रेमभंगातून जीव दिला होता. तिच्या मृत्यूनंतरही ती परिसरात दिसल्याचे काही लोक छातीठोकपणे सांगत होते. पण त्याचा मात्र या भाकडकथांवर कधीच विश्वास बसला नव्हता. आता मात्र या आठवणीने त्याचे मन अस्वस्थ झाले.

अंधारात खोलीच्या बाहेर जायची त्याला भीती वाटत होती. पण त्या आवाजाचा शोध घेणे गरजेचे होते. त्याशिवाय त्याला झोप लागली नसती. त्याने अवसान गोळा केले. खोलीचे दार उघडून तो बाहेर आला. ती अमावस्येची रात्र होती. वीज नसल्यामुळे घरात मिट्ट काळोख होता. भीतीने त्याच्या अंगाला हलकासा घाम फुटला होता. घाबरण्याचे काही कारण नाही, त्याने स्वतःला बजावले. शेजारच्या खोलीमध्ये त्याचे आई-वडील झोपले होते. क्षणभर त्याने आई-वडिलांना उठवण्याचा विचार केला. परंतु इतक्या रात्री तसे करणे त्याला प्रशस्त वाटले नाही. काही वेळ तो त्याच्या खोलीच्या दारातच उभा राहिला. पुढे जावे कि न जावे याचा विचार करत.

तेवढ्यात त्याला तो आवाज पुन्हा ऐकू आला. तो चाचपडत दोन पावले पुढे आला. आता आवाज जास्त स्पष्ट ऐकू येत होता. भीतीने त्याच्या अंगाला हलकासा कंप सुटला. त्याला वाटले परत फिरावे व खोलीत जाऊन दार बंद करून झोपी जावे. मरूदे तो आवाज. पण त्या आवाजचे कारण कळल्याखेरीज त्याला स्वस्थता लाभली नसती. त्याने कानोसा घेतला. त्याच्या आई-वडिलांच्या बेडरूम शेजारी एक छोटी खोली होती. त्या खोलीचे दार बंद होते. आवाज त्या छोट्या खोली मधून येत होता. संथपणे सलग हलकीशी शीळ घातल्यासारखा. जणूकाही कोणीतरी त्याला आत बोलावीत होते. मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे आवाज ऐकत तो काही वेळ उभा राहिला. खोलीचे दार उघडून पहावे का? नको. न जाणो आत काय दिसायचे? जे काही आहे ते बंद दारापलीकडेच चांगले.

शेवटी त्याने परत फिरण्याचा निर्णय घेतला. तो त्याच्या खोलीत जाण्यासाठी वळला. तो खोलीत जाणार इतक्यात त्याला कोपऱ्यात काहीतरी दिसले. त्याने डोळे ताणून पहिले. भिंतीला टेकून कोणीतरी बसले होते. दोन्ही पाय जवळ ओढून गुढग्यात तोंड खुपसून. त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडण्यापूर्वी त्याने ओठ घट्ट मिटून घेतले. त्याचा आवाज ऐकून त्याने मान वर केली तर? देवा देवा देवा. ते होते तरी काय आणि त्याच्या घरात काय करत होते? भीतीने त्याची गाळण उडाली होती. त्याने मनात मंत्रजप सुरु केला. त्याच्या खोलीचे दार दोन पावलांवर होते. पण तिथपर्यंत तो पोहचू शकेल याची त्याला खात्री वाटत नव्हती. त्याचे पाय लटलट कापत होते. त्या कोपऱ्यातल्या आकाराकडे न पाहण्याचा तो आटोकाट प्रयत्न करीत होता. पण त्याची नजर पुनःपुनः तिकडेच वळत होती. तो चाचपडत त्याच्या खोलीच्या दारापर्यंत पोहोचला. आता एक पाऊल टाकले कि खोलीच्या आत जायचे आणि आपल्या पाठीमागे दार बंद करायचे. परंतु, तो खोलीत प्रवेश करणार, इतक्यात खोलीचे दार त्याच्या तोंडावर धाडकन बंद झाले.


***
त्याला जाग आली तेंव्हा सकाळचे आठ वाजले होते. रात्री त्याला व्यवस्थित झोप लागली नव्हती. पाय पोटाशी घेऊन व पांघरून डोक्यावरून घेऊन तो झोपला होता. पण तरीही त्या आवाजाने त्याला अधून-मधून जाग येत होती. कालच्या प्रकरणाचा बंदोबस्त आजच करायचा निश्चय त्याने केला. ते कोण करू शकेल हे त्याला चांगलेच माहीत होते. पूर्वी त्याच्या मित्राने एका प्रसंगात अश्या माणसांची मदत घेतली होती. ती माणसे अशी कामे करण्यात तरबेज होती. शेवटी ज्याची विद्या त्यालाच जमते. हे येरागबाळ्याचे काम नव्हे. यावेळी त्यालाही त्या माणसांना शरण जावे लागणार होते. आज त्याचे आई-वडील बाहेर जाणार होते. ते परत येण्यापूर्वी हे काम त्याला तडीस न्यायचे होते. त्याने फोन उचलला. एक दीर्घ श्वास घेतला व ‘त्यांना’ कॉल लावला.

दुपारी दोन माणसे त्याच्या दारात हजर झाली. त्यांना पाहून त्याला हायसे वाटले. एकाच्या खांद्याला पिशवी अडकवलेली होती. त्या पिशवीवाल्या माणसाने प्रश्नार्थक भुवया उंचावल्या. त्याने त्या छोट्या खोलीकडे बोट दाखविले. शब्दांची गरज नव्हती. सर्व बोलणे फोनवरून अगोदरच झाले होते. सगळे काही माहित असल्याप्रमाणे ती माणसे त्या छोट्या खोली मध्ये शिरली. त्यांच्या पिशवीतून त्यांनी नानाविविध गोष्टी काढायला सुरुवात केली. त्या सर्व गोष्टींकडे तो डोळे विस्फारून पाहत होता. त्या माणसांनी परिस्थितीचा अंदाज घेतला व त्यांच्या कामाला सुरुवात केली. तो खोलीच्या बाहेर उभा राहून पाहत होता. आता त्याला करण्यासारखे काही नव्हते. त्याचे आई-वडील परत येण्यापूर्वी हे सर्व संपावे अशी त्याने मनोमन प्रार्थना केली.

तासाभराने त्या माणसांचे काम संपले. “आम्ही पूर्ण बंदोबस्त केला आहे. पुन्हा असा प्रकार होणार नाही.” त्यांनी त्याला आश्वस्त केले. “... आणि झालाच तर, आम्ही आहोतच.” त्यातला एकजण गूढपणे म्हणाला. त्याने चमकून त्यांच्याकडे पहिले. दोघांच्याही चेहऱ्यावर मंद हास्य होते. त्यांचा मोबदला घेऊन ते निघाले.

ती माणसे निघून गेली आणि त्याच वेळी त्याचे आई-वडील बाहेरून परत आले.
“काय रे, कोण होती ती माणसे आणि आपल्या घरी कशाला आली होती?” त्याच्या वडिलांनी विचारले.
आता सर्व खरे सांगणे त्याला भाग होते. “प्लंबर होते. बाथरूम मधील नळ खराब झाला होता. त्यातून शिटी वाजविल्यासारखा आवाज येत होता. मला त्या आवाजाने रात्री झोप लागली नाही.” तो पुटपुटला.
“अरे मग मला सांगायचे ना. मी दुरुस्त केला असता. उगीच प्लंबर वर कशाला पैसे खर्च केलेस?”
“तुम्ही बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करायला जाता आणि त्या जास्तच बिघडवून ठेवता. म्हणूनच मी तुम्हाला न सांगता तुमच्या माघारी हा बेत केला होता.”
हे खरे होते. त्याचे वडील नरमले. त्यांनी हातातली पिशवी कोपऱ्यात ठेवली.
“ती पिशवी तिथे ठेऊ नका.” तो जवळपास ओरडलाच. वडिलांनी चमकून त्याच्याकडे पाहिले. “रात्रीच्या अंधारात कोणीतरी तिथे बसले आहे असे वाटते.” तो ओशाळून म्हणाला.
“आणि आई, तू घरातल्या खिडक्या उघडतेस. पण झोपण्यापूर्वी बंद करत नाहीस. मग रात्री वारे सुटले कि दारे आपटतात.” तो आवेशाने म्हणाला.
“मग तू बंद कर.” त्याची आई दुप्पट आवेशाने म्हणाली, “नाहीतरी तुला काय काम आहे? दिवसभर भयकथा तर वाचत असतोस.”
तो वरमला. पण तो काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. फोनवर एक संदेश त्याची वाट पाहत होता. तो संदेश वाचून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. तो अस्वस्थ झाला. गडबडीने अंगात टी-शर्ट अडकवून तो बाहेर जायला निघाला.
“कोठे निघालास?” आईने विचारले.
“वीजबिल भरायला. मी भरायचे विसरलो. त्यांनी काल रात्री आपली वीज बंद केली आहे.” तो म्हणाला व विजेच्या वेगाने बाहेर पडला.

समाप्त.

No comments:

Post a Comment