Tuesday, 14 January 2025

बंधुप्रेम - शतशब्दकथा

 आज सकाळपासून त्याची लगबग चालू होती.

“कसली गडबड चाललीय?” त्याच्या पत्नीने विचारले.
“आज मी खीर बनविणार आहे. माझ्या भावासाठी.”
“पण मला तर खीर विशेष प्रिय नाही,” त्याचा भाऊ उद्गारला.
यावर त्याने फक्त मंद स्मित केले.

दुपारी एका अतिथिने दारावर थाप मारली. त्याने लगबगीने दार उघडले व अतिथिला घट्ट मिठी मारली. दोघेही अश्रूंच्या धारांमध्ये भिजून निघाले. पोटभर गप्पा मारून झाल्यावर त्याने अतिथिला आपल्या हाताने खीर खाऊ घातली. अतिथि तृप्त झाला.

“मी आपल्या सर्वांना परत न्यायला आलोय.” अतिथी म्हणाला.
त्याने नम्रपणे पण ठामपणे नकार दिला. अथितीचा नाईलाज झाला.

सायंकाळी आपल्या प्रिय बंधूच्या पादुका डोक्यावर घेऊन तो अतिथी जड मनाने राजधानीकडे परत निघाला.

No comments:

Post a Comment